पुणे – राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील (Minority Communities) व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.
नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 आता सुरु होत आहे.अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मीडिया, चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.
योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा.