पुणे: पीएच.डी. प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘पेट’ परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी एकदा संशोधन केंद्र निवडल्यास त्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी रिक्त जागांचा तपशील पाहूनच संशोधन केंद्र निवडावे, असे आवाहन पुणे विद्यापीठाचे उपलकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी केले आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्या शाखानिहाय, विषयनिहाय आणि प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध केला आहे. ही सर्व प्रक्रिया येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांनी हा तपशील समजून त्यांच्या लॉगिनमधून संशोधन केंद्र निवडायचे आहे व त्यांच्या प्रस्तावित संशोधन कार्यासंदर्भातील स्पेशलायझेशनही नमूद करायचे आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्र निवडल्यास ते बदलता येणार नाही, असेही डॉ. रासवे यांनी परिपत्रकाद्वारे कळवले.