पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कतार येथे उपकेंद्र सुरू झाले असून, आता विद्यापीठातर्फे जॉर्जिया, दुबई, सौदी, कझाकिस्तान येथे उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून शनिवारी परदेशात उपकेंद्र सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला.
पुणे विद्यापीठातर्फे सुमारे तीन वर्षांपूर्वी कतार येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले. कतारच्या धर्तीवर विद्यापीठाने इतर ठिकाणी सुद्धा उपकेंद्र सुरू करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. काही महिन्यांपूर्वी जॉर्जिया, दुबई, सौदी, कझाकिस्तान यांनी विद्यापीठाचे उपकेंद्र आपल्या देशात सुरू करावे. यासंदर्भात विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार विद्यापीठाने त्यावर सकारात्मक पाऊले उचलली आहेत.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा व्यवस्थापन परिषदेचा प्रयत्न आहे. त्यामुळे शनिवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत जॉर्जिया, दुबई, सौदी, कझाकिस्तान येथे उपकेंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.