पुणे : जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे पडते, हे वाक्य पिंपरीतील एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने करून दाखविले आहे. अपघातात पाय गमावलेल्या ओमकार लकडेने चक्क एका पायावर रायगड किल्ला सर केला आहे. त्यामुळे त्याचे पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात भरभरून कौतुक होत आहे.
ओमकार लकडे हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यांच्या शाळेची सहल २० जानेवारीला रायगडावर जाणार होती. तेव्हा ओमकारने गडावर येण्याची प्रखर इच्छा व्यक्त केली. त्याचा हा हट्ट पाहून शिक्षक ही अवाक् झाले. पालकही ओमकारच्या पाठिशी उभे राहिले. हे पाहून शाळेने त्याला रायगडावर घेऊन जायचे ठरविले.
ठरल्याप्रमाणे २० जानेवारीला विद्यार्थ्यांची सहल रायगड किल्ल्याजवळ गेली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सकाळीच रायगड सर करायला सुरुवात झाली. मात्र आता ओमकारला हे शक्य होईल का? आधीच एक पाय गमावलेल्या ओमकारला आणखी काही दुखापत तर होणार नाही ना? अशा प्रश्नांची काहूर शिक्षक अन् इतर विद्यार्थ्यांच्या मनात करु लागले. परंतु, ओमकारने जे ध्येय बाळगले होते, तो त्या दिशेने आगेकूच करु लागला. कोणाचीही मदत न घेता केवळ त्याच्या साथीला असणाऱ्या कुबड्यांच्या मदतीने तो रायगडावर जोमाने चढू लागला.
दरम्यान, शिवकाळात घोड्यांच्या टापांचा जसा आवाज रायगडावर घुमायचा अगदी तशीच अनुभती ओमकारचा कृत्रिम पाय अर्थात कुबड्यांमुळे येत होती. बघता बघता निम्मा टप्पा सर झाला होता, पण तरीही सोबतीला असणारे शिक्षक आणि विद्यार्थी ओमकारसाठी चिंतेत होते. तो थकू नये म्हणून ”जय भवानी जय शिवाजी”, ”छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष वारंवार केला जात होता. आजूबाजूने निघालेले इतर शिवभक्त ही ओमकारला पाहून आश्चर्यचकित होत होते. तसेच त्याला प्रोत्साहन देत होते.
सव्वा दोन तासात ओमकारने रायगड किल्ला सर केला. अन् त्याच जोमाने तो खालीही उतरला. ओमकारने केलेली ही किमया अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे. म्हणूनच ओमकारच्या या जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीला ”पुणे प्राईम न्यूज” चा सलाम..!