पुणे : पुण्यातील बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकाला साहित्य अकादमी सन्मान जाहीर झाला आहे. बाल व कुमार साहित्यात आपल्या लेखनीने वेगळा ठसा उमठविणार्या लेखिका डॉ. संगीता बर्वे या मागील पाच वर्षांपासून अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषविले आहे.
साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी विविध वाड्:मय प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार दिले जातात. बुधवारी 22 भाषेतील पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात मराठी भाषेतील पुरस्कार डॉ. बर्वे यांना जाहीर झाला आहे. डॉ. संगीता बर्वे यांनी विविध बालकुमार साहित्य संमेलनात साहित्याचे सादरीकरण केले आहे. अनेक शाळांमधून त्यांचे हजारो बालसाहित्याचे कार्यक्रम झाले आहेत.
डॉ.संगीता बर्वे म्हणाल्या , “साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे. मुलांनी दैनंदिनी लिहावी, या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. मुलांनी लिहिते व्हावे, हाच या पुस्तक निर्मितीमागचा हेतू आहे. आणि तो हेतू साध्य झाला आहे. मुले मोठ्या संख्येने लिहिते होत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे,”
झिपरू आणि बोबडगाणी हे दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आदितीची साहसी सफर या पुस्तकाचा आनुवाद डॉ. बर्वे यांनी केला आहे. कचर्याचा राक्षस आणि ग्रिनी हे पुस्तकही त्यांचे प्रसिद्ध आहे. गंमत झाली भारी, उजेडाचा गाव, रानफुले, झाड आजोबा, खारूताई आणि सावलीबाई, मिनूचे मनोगत, भोपळ्याचे बी, नलदमयंती आणि इतर कथा आदी बालसाहित्य प्रकाशित आहे. मृगतृष्णा, दिवसाच्या वाटेवरून, अंतरीच्या गर्भी हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गंमत झाली भारी, या रे या सारे गाऊ या, बच्चों की फुलवारी आदी व्हीसीडी आहेत.