पुणे : मंत्रालयीन विभाग आणि बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांमध्ये गट ड संवर्गातील लिपिक आणि टंकलेखक या पदांची भरती दुय्यम सेवा निवड मंडळाऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येईल, असे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारी कार्यालयातील गट ‘क’ मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाने विहित करण्यात आलेली कार्यपद्धती सर्व लिपिकवर्गीय पदभरतीसाठी लागू राहील. तथापि, यापैकी प्रथम टप्प्यात लिपिक, टंकलेखकाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील.
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी विहित नमुन्यात विशिष्ट मुदतीत नियुक्ती प्राधिकारीनिहाय मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यासाठी मंत्रालय पातळीवर सहसचिव अथवा उपसचिव यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी.
सर्व मंत्रालयीन विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग या दोन्ही पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतील. जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम घेण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे उमेदवारांची शिफारस यादी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पाठविणार आहे.
दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील लिपिकवर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आली असली तरी, या पदांना यापूर्वी जे आरक्षण लागू होते. त्यानुसारच सदर पदांना आरक्षण व अन्य सोयीसुविधा लागू असतील असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.