पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज सोमवारी (ता.३०) होणारा पेपर पुढे ढकलला आहे. तर तो पेपर नव्या वेळापत्रकानुसार रविवारी (ता.५) फेब्रुवारी रोजी पूर्वीच्याच वेळापत्रकातील वेळेनुसार होणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांची हिवाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे आजच्याच दिवशी नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही महाविद्यालये मतदान केंद्र म्हणून जाहीर झाले आहेत.
त्यामुळे एका दिवसाचे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तर हा निर्णय विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यासाठी लागू आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत विस्तृत माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाचे उर्वरित सर्व पेपर नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचे परीक्षा विभागाने जाहीर केले आहे.
त्यामुळे आजचा रद्द झालेला पेपर रविवारी (ता.५) फेब्रुवारी रोजी पूर्वीच्याच वेळापत्रकातील वेळेनुसार होणार आहे.