पुणे : खेळ हा प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी गोष्ट असून, त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते. याशिवाय खेळ हा प्रत्येकाला आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट शिकवतो ती म्हणजे पराभव पचविणे. त्यामुळेच एका चांगल्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती ही सामाजिक जीवनात मैदानाबाहेरही उठून दिसते, असे पुणे आर्मी क्रीडा अकादमीचे कमांडंट देवराज गिल यांनी सांगितले.
एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग येथे प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन(पेरा) द्वारे आयोजित ‘पेरा’ प्रीमिअर चॅम्पियनशिपच्या उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष व ‘पेरा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, ऑलिंम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे डॉ. गुलजार शेख, एमआयटी डब्लूपीयूचे पोपट धानवे, डॉ.अतुल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रा. डॉ. कराड म्हणाले की, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वच आघाड्यांवर पुढे जात आहे. खेलो भारत, टार्गेट ऑलिम्पिक पोडियमसारख्या योजनांमुळेच भारताने हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक पदकांचे शतक पूर्ण केले. त्यातूनच प्रेरणा घेत ‘पेरा’ चॅम्पियनशिपच्या माध्यमातून राज्यातील नामांकित खासगी विद्यापीठांनी एकत्रित येत या स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले. ज्याला तब्बल ३५ विद्यापीठांनी उत्तम प्रतिसाद दिला, ज्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली आहे.
एमआयटी शिक्षण समूहाने कायमच ‘विश्वनाथ स्पोर्टस मिट’सारख्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याचे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे “पेरा’च्या माध्यमातून सहभागी खेळाडूंनी पुढे जाऊन आपल्या देशाचे नाव मोठे करावे यासाठी माझ्या मनस्वी शुभेच्छा.
विश्वशांती प्रार्थना व दीपप्रज्वलनानंतर ‘मॅनेट’ बॅंडच्या आकर्षक सलामीद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्व सहभागी विद्यापीठांच्या ध्वजवाहक यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंचे संचलन मैदानावर घेण्यात आले. त्यामध्ये ३५ हून अधिक विद्यापीठांतील तीन हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. हे सर्व खेळाडू पुढील तीन दिवस १५ हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचे कौशल्य पणाला लावणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुराज भोयार यांनी केले तर आभार ‘पेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हनुमंत पवार यांनी मानले.