लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी, कोथरूड यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्रातील अनेक माजी मंत्री यांचे स्वीय सहाय्यक असलेले जेष्ठरत्न अण्णासाहेब टेकाळे यांच्य़ा ७५ वर्ष अमृत महोत्सवानिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युशन्सचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
यावेळी माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री भास्करराव खातगावकर –पाटील, स्वाती कराड-चाटे, माजी सहकार आयुक्त सतीश सोनी, राजेश टेकाळे, डी. एन चापके, पोलिस आयुक्त आर. जी. शिंदे, अमृत टेकाळे, श्री दांगट, एमआयटी डब्ल्युपीयुचे कुलगुरू डॉ.आर. एम. चिटणीस, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा म्हणाले, काम लवकर करण्याची यांची पद्धत अतिशय महत्वाची आहे. कोणत्याही व्यक्तिला वेळेपेक्षा अधिक काळ थांबवू नये. ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आयुष्यात काहीही शाश्वत नाहीत, मात्र जोडलेली माणस ही आयुष्यभर टिकतात, म्हणून माणस जोडता आले पाहिजे.
माजी मंत्री माधवराव किन्हाळकर म्हणाले, वयाने मोठ असून ही अण्णासाहेब टेकाळे यांनी कधी ही आपल्या कार्यकतृत्वात खंड पडू दिला नाही. ७५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य हातात घेतले ते पूर्ण केले. कर्म जिव्हाळ्याने करणाऱ्यांना यश मिळत असते, हे त्यांनी दाखवून दिले. कामाच्या प्रति समर्पित भावना ठेवल्याने त्यांनी अनेकांना जोडून ठेवले आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, जेष्ठ समाजसेवा रत्न आणि मानवतारत्न व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब टेकाळे होय. नम्रतेतून जग जिकता येते ही शिकवण त्यांनी दिली. खेड्यातून आलेल्या युवकांनी नम्रतेच्या माध्यमातून यश संपादन कसे करावे हे टेकाळे यांच्या व्यक्तिमत्वातून दिसते.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, निष्ठा आणि मेहनत आणि विश्वासर्हतेच्या जोरावर कोणत्याही अडचणीवर मात करता येते. 1972 ते 2006 पर्यंत अण्णासाहेब टेकाळे यांनी समाजाच्या कार्यासाठी सदैव कार्य करत राहिले. एकत्र कुटुंब पद्धतीचा एक गुण म्हणजे परिवारातील सर्वांना समान वागणुक देणे होय.