मुंबई : वैद्यकीय शिक्षण आता मराठीतून सुरु होणार आहे. आणि या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ च्या चालू शैक्षणिक वर्षांपासून होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एमबीबीसी व आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी असे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असणार आहे. तर, मूळ वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही .वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याची पाहणी आणि मांडणी एक समिती करणार आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात आली आहे.
राज्यात सध्याच्या घडीला एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ महाविद्यालये आहेत. त्यात १०,०४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठ १२ तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.