पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण 95.81टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (99.01 टक्के) तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (94.73 टक्के) आहे. यंदाच्या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के एवढा लागला आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. 94.56 टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी 93.83 टक्के निकाल लागला होता. गेल्यावर्षी राज्यातील 108 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते.
यावर्षी महाराष्ट्र उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालात राज्यातील नऊ विभागांमधून तब्बल 187 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत. यापैकी सार्वधिक 100 टक्के प्राप्त केलेले विद्यार्थी लातूरमधील विभागातील आहेत. लातूर विभागात तब्बल 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के प्राप्त झाले आहेत.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की यंदा परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. त्यासाठी २७१ भरारी पथके आणि महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके कार्यरत होती. एकूण आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली.
विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
पुणे : 96.44 टक्के
नागपूर : 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
मुंबई : 95.83 टक्के
कोल्हापूर : 97.45 टक्के
अमरावती : 95.58 टक्के
नाशिक : 95.28 टक्के
लातूर : 95.27 टक्के
कोकण : 99.01 टक्के
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/