संतोष पवार
पळसदेव : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तथा महाज्योती अंतर्गत (नागपूर) राज्यातील JEE / NEET / MHT-CET 2026 करिता परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. त्याकरिता राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरच्या ऑनलाइन प्रशिक्षणाकरता विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत टॅब आणि ६ जीबी इंटरनेट डाटा मोफत देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी मार्च २०२४ मध्ये इ. १० वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि त्याने इ ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा. सदर प्रशिक्षणाकरिता होणारी विद्यार्थ्याची निवड ही इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण यानुसार केली जाईल. शहरी भागातील विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ६० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत.