राजेंद्रकुमार गुंड
माढा, (सोलापूर) : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात भयंकर मोठी स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार करिअर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. विनाकारण पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादून त्यांच्यावर ताणतणाव वाढवू नये, असे आवाहन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी केले.
पिंपळनेर (ता. माढा) येथील आर्या पब्लिक स्कूलमधील दहावी तसेच बारावी शास्त्र शाखेतील प्रथम तीन क्रमांक मिळविणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वरील प्रतिपादन शिंदे यांनी केले.
यावेळी आर्या पब्लिक स्कूलमधील दहावी तसेच बारावी शास्त्र शाखेतील प्रथम तीन क्रमांक मिळविणारे ऋषभ शहा ,प्रद्युम्न शिंदे, रिसा शहा यांचा नीट परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल, प्राजक्ता नवगिरे, अब्दुलमोईद काझी, ऋतुजा शिंदे यांचा नीट परीक्षा व एमएचटी-सीईटी परीक्षेतील यशाबद्दल तसेच माजी विद्यार्थी स्वप्निल यादव याने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत ४५९१ ऑल इंडिया रँक मिळवून आयआयटीला प्रवेश मिळाल्याबद्दल चेअरमन रणजितसिंह शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक औदुंबर शिंदे, प्राचार्य रवींद्र लोखंडे, उपप्राचार्य अन्वर मुलाणी, मुख्याध्यापिका प्रमिला मगर, सतीश वरपे, कुमार बडे यांच्यासह पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना अध्यक्ष शिंदे म्हणाले, “माढा मतदारसंघात टप्प्याटप्प्याने अद्ययावत व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत आहोत. माढा येथे डी फार्मसी व बी फार्मसी कॉलेज आणि टेंभुर्णी येथे डी फार्मसी कॉलेज सुरू केले आहे. भविष्यात आणखी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक शैक्षणिक संकुल उभारण्याचा मानस आहे. प्रास्ताविक सहशिक्षक दादासाहेब आधटराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रियांका कन्नडकर यांनी केले.आभार अन्वर मुलाणी यांनी मानले.