लहू चव्हाण
पाचगणी : भिलार हे देशातील पुस्तकांचे पहिले गाव म्हणून नावारूपाला आले. ‘राज्य सरकारने पुस्तकांचे गाव साकारले; पण शेजारीच असणाऱ्या पाचगणीतील पुस्तकांचे घर असलेले वाचनालय अनुदानाअभावी बंद पडल्याने वाचक प्रेमीं मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अनुदानित असणाऱ्या वाचनालयांना व्यवस्थापनासाठी अ, ब, क, ड वर्गनिहायनुसार सहा महिन्यांच्या कालावधीनंतर वर्षातून दोन टप्प्यांत अनुदान दिले जाते.
या अनुदानातून कर्मचारी पगार, दैनिके, साप्ताहिके, मासिके यांचे बिले, ग्रंथ खरेदी आदीसह इतर व्यवस्थापन खर्च केला जातो. दिवसेंदिवस पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे वाचन संस्कृती जोपासायची असेल तर शहरातील वाचनालय टिकणे गरजेचे आहे.
पण पाचगणी येथील विद्यार्थी वाचनालय समिती व शासन यांचा समन्वय नसल्याने अनुदाना अभावी वाचनालय बंद करण्याची नामुष्की समितीवर आली आहे.
सन १९४४ साली स्थापन झालेल्या या वाचनालयात विविध प्रकारचे ग्रंथ, ऐतिहासिक कादंबऱ्या, बाल साहित्य, कवितासंग्रह असल्याने अभ्यासासोबत वृत्तपत्र वाचण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांसाठी हे वाचनालय आधारस्तंभ होते.
प्रशासकीय अनास्थेमुळे अनुदाना वाचून वाचनालय बंद पडणे ही खेदजनक बाब आहे.विद्यार्थी वाचनालय समिती व प्रशासन यांनी समन्वय साधून लवकरात लवकर हे वाचनालय सुरू करावे अशी मागणी शहर व परीसरातून जोर धरू लागली आहे.