पुणे : जर्मन बेकारी परिसरात काल रात्री (ता. २४) गोळीबार झाल्याने पुन्हा एकादा हा परिसर गुन्हेगारांमुळे हादरून गेला आहे. कोरेगाव पार्क परिसरात वाढदिवस साजरा केल्यानंतर दोन गट आमनेसामने आले. पूर्ववैमनस्यांतून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्या दोडमणी, नट्टी उर्फ रोहन निगडे, नितीन म्हस्के, धार आज्या व चार अज्ञान लोकांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी इम्रान हमीद शेख याने पोलिसांत याबाबत तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार इम्रान हमीद शेख व त्याचे मित्र सागर कोळनट्टी, विवेक नवघरे, सागर गायकवाड, बबन इंगळे, मल्लेश कोळी, लॉरेन्स पिल्ले, गणेश पोळ, क्रीश सोनवणे हे सर्व त्यांचा मित्र असलेल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. सर्वानी त्यांचाच मित्र असलेल्या रोहित यांच्या गेरा लिजेंट प्रिमायसेस को -ऑप सेसायटीमध्ये असलेल्या पाचव्या मजल्यावरील हॉटेल रॉकवॉटर या ठिकाणी वादहादिवस साजरा केला.
दरम्यान, वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्व जाण्यासाठी निघाले. खाली येऊन घरी जाण्यासाठी पार्क केलेल्या दुचाकी काढत होते. यावेळी आरोपी सोन्या दोडमणी, नट्टी उर्फ रोहन निगडे, नितीन म्हस्के, धार आज्या व तीन चार लोक यांची वाट पाहात होते. या आरोपिंनी तक्रारदाराचा मित्र असणाऱ्या सागर कोळनट्टीयाला पूर्व वैमनस्यातून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत असताना आरोपी सोन्या दोडमणी याने कमरेला असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला.
पोलिसांनी सोन्या दोडमणी, नट्टी उर्फ रोहन निगडे, नितीन म्हस्के, धार आज्या व चार अज्ञान लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.