लहू चव्हाण
पाचगणी : महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापीठ गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, पांचगणी येथे आंतरशालेय गूडविल रोलिंग ट्रॉफी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी विद्यानिकेतन हायस्कूलचे प्राचार्य डॉ. प्रशांत होमकर व गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कुर्माराव रेपाका यांच्या हस्ते करण्यात आले.
सलग दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या यजमान टीमसह महाबळेश्वर तालुक्यातील विविध शाळेतील १४ व १७ वयोगटातील मुले व मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता. १७ वर्षाखालील मुलांमध्ये भारती विद्यापीठ गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचा संघ विजेता ठरला. तर १४ वर्षांखालील मुले व १७ वर्षाखालील मुली यांनी उपविजेतेपद पटकावून शाळेचे नाव उज्वल केले. रोमांचक सामन्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
दरम्यान, या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे बिलिमोरिया हायस्कूलचे प्राचार्य विशाल कानडे व प्राचार्य कुर्माराव रेपाका यांच्या अध्यक्षते खाली विजेत्यांना रोलिंग ट्रॉफी व पंचांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या कृपाशीर्वादाने, संचालक एम.डी. कदम व डॉ. अरुंधती निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख मानस पती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.