लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कदमवाकवस्ती परिसरात क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मेजर ध्यानचंद यांची प्रतिमा घेऊन व घोषवाक्ये देत विद्यार्थी या प्रभात फेरीत उत्साहात सहभागी झाले होते.
प्रभातफेरी शाळेत आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या मिनल बंडगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तर रेनबो स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी शाळेच्या विश्वस्त मंदाकिनी काळभोर उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. क्रिडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली. नितीन काळभोर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल मुलांना माहिती सांगितली. मंदाकिनी काळभोर यांनी खेळ आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, कार्यक्रमाची सांगता झाल्यावर शाळेअंतर्गत कबड्डी व १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून दिपक शितोळे, प्रशांत लव्हारे, अश्विन मनगुतकर, नीला सायकर, सीमा गिरी यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पूनम सिंग यांनी मानले.