पुणे : पुणे शहरानंतर आता पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मुळशी, मावळ, भोर,व वेल्हा या आठ तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या अशा सर्व विद्यार्थ्यांना उद्या दिनांक १४ ते १६ जुलै या दरम्यान, तीन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर व पुरंदर या तालुक्यांमधील शाळा मात्र चालू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केले आहे.
पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवसासाठी हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र, पुणे यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक १४ आणि १५ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता सदर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी आणि पालक यांच्यावर यांना होवू नये याकरीता पुणे जिल्ह्यातील (इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून) इतर सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या (प्री स्कुल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना दिनांक १४/०७/२०२२ ते शनिवार, दिनांक १६/०७/२०२२ पर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
दरम्यान इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून हा आदेश दिला असून तेथील शाळा सुरू राहणार आहेत. मात्र पाऊस पाण्याचा अंदाज घेऊन या तालुक्यांनाही सुटी मिळू शकते असे सूत्रांनी सांगितले.