लहू चव्हाण
पाचगणी,दि.२४ : पाचगणी (गोडवली,ता.महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप तथा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक शहाजी सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्र प्रमुख दीपक चिकणे उपस्थित होते.
यावेळी दीपक चिकणे यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी सविस्तर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शहाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्ती वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत पेपर सोडवताना आधी कोणते प्रश्न सोडवावेत, प्रश्नांच्या उत्तराची मांडणी कशी असावी, या विषयी मागर्दशन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी त्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या निकालाची परंपरा चांगली राखू असा निर्धार बोलून दाखवला. श्रावणी कोंढाळकर हिने आपले मनोगत कवितेतून व्यक्त केले.
यावेळी प्राजक्ता माने, कुमार कांबळे, आर.वाय.देशमुख सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कू. वैष्णवी पवार, प्राची मालुसरे यांनी केले तर प्राची मालुसरे हिने आभार मानले.