राहुलकुमार अवचट
यवत – शाळेला अनुदान असतानाही विद्यार्थ्यांकडून दहापट जादा रक्कम घेतल्याप्रकरणी खामगाव (ता. दौंड) येथील खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या “न्यू इंग्लिश स्कूल” या शाळेला ८० लाखाचा दंड भरण्याचे आदेश गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांनी दिले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कर्तव्यदक्ष प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांची राजकीय दबावामुळे बदली करण्यात आली होती. पदावर कार्यरत असताना भुजबळ यांनी गोरगरीब जनतेला जाता जाताही न्याय देण्याचे कार्य केले आहे. यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच अशा कर्तव्यदक्ष अधिकार्यांची बदली केल्याने जिल्हा प्रशासनाबद्दल पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
खामगाव (ता. दौंड) येथील खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेने इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांकडून प्रत्येकी ५८०० /- रुपये फी अनाधिकृतपणे वसूल केली आहे. आणि मोफत शिक्षणाला हरताळ फासल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी यांची दुप्पट दंड वसूल करण्याबाबत पत्र प्रसिद्ध केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल या शाळेने इयत्ता ५ वी ते ८ वीच्या वर्गाला १००% टक्के अनुदान आहे. हे असतानादेखील शाळेने सन २०२२-२३ या वर्षात १३५ विद्यार्थ्यांकडून एकूण ७ लाख ९५ हजार वसुल केले आहे. या संदर्भात झालेल्या चौकशीत शाळेचे मुख्याध्यापक संजीव धर्माजी नेवसे यांनी दिलेल्या जबाबात संस्थापक अध्यक्ष माणिक कृष्णाजी नागवडे यांच्या सांगण्यावरून पर्यवेक्षक रमेश लक्ष्मण दुधाट व उपशिक्षिका ताई सोमाजी टेमगिरे यांनी जमा केल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, शाळेने मोफत शिक्षण देणे बंधनकारक असताना शिक्षणाचा हक्क अधिनियम ,२००९ च्या तरतुदीनुसार या संस्थेस दहापट रक्कम म्हणून ७९ लाख ५० हजार दंडाची कारवाई करण्यात पात्र आहे. आणि वरील रक्कम ७ दिवसांच्या आत शासनास जमा करावी. तसेच पालकांनी भरलेली रक्कम व्याजासह परत करावे. असे आदेश गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांनी दिले आहेत