दीपक खिलारे
इंदापूर : पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत डी. वाय. पाटील महाविद्यालय पिंपरी येथील दिव्यांक अरु हा ‘जिल्हा आंतर महाविद्यालय श्री’ किताबाचा मानकरी ठरला तर उपविजेताचा मान इंदापूर महाविद्यालयास मिळाला. हडपसरचे ए. एम. महाविद्यालय सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले. त्यांना कर्मयोगी शंकररावजी पाटील फिरता चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२६) पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेचे इंदापूर महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील २० महाविद्यालयातील ४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. राजवर्धन पाटील यांनी स्पर्धतील युवकांचे स्वागत करून पुढील स्पर्धेसाठीच्या शुभेच्छा दिल्या.
इंदापूर महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या निमित्ताने विद्यापीठाने आणि जिल्हा क्रीडा समितीने ही स्पर्धा इंदापूर महाविद्यालयात आयोजित करण्यास परवानगी दिल्याने ही स्पर्धा भव्य अशा प्रांगणामध्ये घेण्यात आली, असे मनोगत प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी यावेळी व्यक्त केले.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. सुहास भैरट यांनी मनोगत व्यक्त केले. इंदापूर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी क्रीडा संचालक अनिल मरे, डॉ.दिनेश सरोदे, कॅप्टन डॉ. रावसाहेब गरड, डॉ. ऋषिकेश कुंभार वाघिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.