-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : यंदा शालेय शिक्षण विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया अनेक महिने रखडली. त्यामुळे एकीकडे आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागला. दरम्यान, चार प्रवेश फेऱ्या राबवून अद्याप राज्यात 27 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यासाठी तातडीने प्रवेश फेरी राबवण्याची मागणी काही पालक संघटनांकडून केली जात आहे.
पुणे जिल्ह्यात आरटीईच्या 17 हजार 588 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यापैकी केवळ 13 हजार 665 प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्याप 4 हजार पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत.
राज्यातील 9 हजार 217 खासगी शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 238 रिक्त जागांसाठी 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर एका नियमित फेरीसह प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी तीन फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी दि. 8 ऑक्टोबरपर्यंत 78 हजार 393 जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.
एकूण 1 लाख 27 हजार जणांची निवड करून त्यातील फक्त 78 हजार 393 जणांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत, तसेच मोठ्या संख्येने अर्ज फेटाळण्यात आल्याचे दिसून येत आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त तसेच प्राथमिक शिक्षण संचालकांकडे करण्यात आली आहे.