अरुण भोई
राजेगाव, (पुणे) : राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत दिवाळी सणानिमीत्त टाकाऊ वस्तूंपासून सुंदर आकाश कंदील तयार केले आहेत.
मुलांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत नैतिक मुल्य आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी राजेगाव शाळेत नेहमीच अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यातून आपली परंपरा, सण, उत्सव यांचे महत्त्व सहजपणे समजून येते.
स्वनिर्मितीतून सुंदर आकाश कंदील तयार झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आकाश कंदील तयार करण्यासाठी शाळेतील टाकाऊ वस्तू तक्ते, कार्डशीट पेपर, बेगडी पेपर, टिंबे पेपर, वनसाईड कलर पेपर, दोरा, फेविकॉल घोटीव कागद इत्यादींचा वापर करून आकाश कंदील तयार करण्यात आले.
दरम्यान, पालकांनीही विद्यार्थ्यांना आकर्षित रंगीत कागद उपलब्ध करून दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे, प्रशांत वाघमोडे, दिलीप शिर्के, संजय नेमाने, तुकाराम उगलमोगले, वैशाली कुदळे आणि योगिता कचरे यांनी प्रयत्न केले. स्नेहल काळे, साहिल लगड यांनी मार्गदर्शन केले.