उरुळी कांचन, (पुणे) : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी (ता. ११) उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या प्रशालेने राष्ट्रीय मोहिमेची जनजागृती करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ यात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, व ग्रामस्थ यांच्या जनजागृतीसाठी शाळेतील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरिता राऊत, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती भोसले, बालवाडी विभागाच्या वैशाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्या त्या विभागातील शिक्षक, सर्व विद्यार्थी, सहभागी झाले होते.
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘आजादी का अमृत महोत्सव’ ‘हर घर तिरंगा झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या महापुरुषांनी दिलेले योगदान आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा या घोषणा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थांच्या हातात घोषवाक्य फलक देऊन घोषणा दिल्या. तिरंग्याचे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न यावेळी प्रशालेच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे ‘हर घर तिरंगा’ अभियान घराघरांत पोहचले आहे.
दरम्यान, शाळेच्या प्रांगणातून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. तेथून आश्रम रोड मार्गे, भैरवनाथ मंदिर, महात्मा गांधी शाळा, तळवाडी चौक, तसेच आश्रम रोडमार्गे पुन्हा शाळेत समारोप करण्यात आला. अतिशय उत्साहात प्रभातफेरी पार पडली.