युनूस तांबोळी :
Ashadhi Vari School : शिरूर, (पुणे) :
चंद्रभागेच्या तिरी,
उभा वारकरी, दुमदुमली पंढरी,
पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी,
विठ्ठल विठ्ठल जय हरि…
या या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवीला…
अशा गिते व अभंगात जयहरी विठ्ठल व माऊली…माऊलीचा जयघोष…टाळ वाजवित निघालेले वारकरी, चिमुकल्या वैष्णवांचा अपार उत्साह, पारंपारिक वेषभुषा आणि पालखी सोहळ्यात अभंग, फुगड्या, विविध खेळ यामध्ये निघालेल्या दिंडीत चिमुकले वारकरी तल्लीन झाले होते.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी येथील ग्रामस्थांनी याची देही याची डोळा अनुभवली. डोईवर हंडा व तुळस घेतलेल्या महिला वारकरी व दिंडीकर, टाळकरी या पालखी सोहळ्याबरोबर विद्यार्थी पारंपारिक वेशात पाहावयास मिळाले.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
कवठे येमाई जिल्हा परिषद शाळेतून हा दिंडी सोहळा संपूर्ण गावातून सवाद्य निघाला होता. पालखीत विठ्ठल रुक्मिणी देवाची मूर्ती ठेवण्यात आली होती. पंढरपूरला गेलेला पालखी सोहळा विद्यार्थ्यांनी हुबेहुब साजरा केला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थ तल्लीन झाले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात 208 मुलामुलींनी वारकरी वेशात दिंडीचा आनंद घेतला.
मुख्याध्यापक शांताराम पोकळे, सखाराम फंड, शरद भोर, शैला इचके, प्रमिला गायखे, प्रमिला मेसे, शिल्पा गावडे, जयश्री कुंभार, कुंदा निचीत, आशा शिंदे यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी नाट्यछटेतून वृक्षारोपण, स्वच्छता, बिज प्रक्रिया, माती परिक्षण या बरोबर विविध आरोग्याच्या समस्यांविषयी दिंडीत प्रबोधन करण्यात आले. या नाट्यछटेमध्ये साई पोपळघट, आयुष ढोबळे, समिक्षा गायकवाड, अनवेशा जाधव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी हा दिंडी सोहळा..
मुख्याध्यापक पोकळे म्हणाले की, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला मोठी यात्रा भरते. त्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. लहान मुलांना या गर्दीच्या वेळी जाता येत नाही. महाराष्ट्राची संस्कृती कशा पद्धतीने असते याचा प्रत्यक्षात अनुभव या विद्यार्थ्यांना यावा, यासाठी शाळेतून गावात दिंडी काढून आनंद व संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी हा दिंडी सोहळा काढण्यात आला आहे.