उरुळी कांचन, ता.३१ : एका मिनिटामध्ये सहा अंकी २८ गुणाकार व एका मिनिटामध्ये सहा अंकी २९ भागाकार सोडवून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अंश राहूल कांचन व इनायत आयात मुलाणी यांची ‘इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
अंश कांचन व इनायत मुलाणी हे पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ या संस्थेत शिक्षण घेत आहेत. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक नवनाथ हंबीर यांचे मार्गदर्शन मिळाले. दरम्यान, ‘इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ कामगिरीबद्दल अंश कांचन व इनायत मुलाणी यांचा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ व ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ सन्मान, सर्टिफिकेट व मेडलसह दोघांनी आमदार राहुल कुल यांची राहू येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अंश कांचन व इनायत मुलाणी यांसह त्यांचे मार्गदर्शक नवनाथ हंबीर यांचा आमदार कुल यांनी अभिनंदन करून सन्मान केला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.