-संतोष पवार
पळसदेव : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून त्याबाबतचे निर्देश उच्च शिक्षण संचालक विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. याबाबत राज्य उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
राज्यातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर सेवक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी समाईक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही, त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत कोणत्याही प्रकारे सहभाग घेता येणार नाही अथवा साहाय्य करता येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
कोणताही कर्मचारी विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार तसेच हस्तक्षेपही करू शकणार नाही, त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही किंवा त्यात भाग घेऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक कामात किंवा प्रचार कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.