दीपक खिलारे
इंदापूर : वनगळी-इंदापूर येथील एस.बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदे (नॅक)कडून अ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उच्च गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.२१) दिली.
देशपातळीवरील नॅक समितीने दि.१६ व १६ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाची पाहणी केली. या दोन दिवसांमध्ये नॅक समितीने संपूर्ण महाविद्यालयाचे सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा ,शिक्षण पद्धती आदी बाबींचा तपासणी करून करून महाविद्यालय गुणवत्तेची अ श्रेणी दिली.
शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस.बी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सन २००९ सुरू झाले. सध्या हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करीत आहेत. या महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रम शिकवले जात आहेत.
नॅक समितीने महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी उपलब्ध असलेले साधनसामग्री, शिक्षण पद्धती, ग्रंथालय, महाविद्यालयात राबविले जाणारे विविध उपक्रम, एन एस एस, परीक्षा विभाग, क्रीडा विभाग, स्पर्धा परीक्षा, रोजगार मार्गदर्शन, सांस्कृतिक विभाग, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, अँटी रॅगिंग, तक्रार निवारण, होस्टेल, मेस अशा अनेक गोष्टींचे मूल्यांकन केले, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयास मिळालेली अ श्रेणी ही महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच पालक या सर्वांच्या प्रयत्नांचे यश आहे. त्याचबरोबर नॅक समिती समन्वयक डॉ. ए. बी.गवळी व संस्थेचे सीएओ एस. बी. देवकर यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे यांनी सांगितले.
महाविद्यालयात अ श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी प्राचार्य, ॲकडमिक डीन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.