पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कामध्ये ३० टक्क्यांनी वाढ वाढविण्यासाठी प्रस्ताव हा राज्य शासनाला दिला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. तसेच प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पुढील वर्षांपासून शुल्कवाढ लागू करण्यात येईल. असेही गोसावी यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना गोसावी म्हणाले, राज्य मंडळाने २०१७ मध्ये केलेल्या शुल्कवाढीनंतर गेल्या सहा वर्षांत शुल्कवाढ केलेली नाही. त्यामुळे शिक्षण मंडळ हे सध्या तोटय़ात आहे. उत्पन्नाच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात खर्च वाढल्याने मंडळाला ४० ते ५० कोटींचा फटका बसत असून, आर्थिक नुकसानावर नियंत्रणासाठी दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क ३० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला.
दहावी आणि बारावीच्या साधारणपणे ३० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा राज्य मंडळामार्फत घेतली जाते. परीक्षा शुल्क, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींचे शुल्क आदी माध्यमातून राज्य मंडळाला उत्पन्न मिळते. सध्या दहावीचे शुल्क ३७५ रुपये, तर बारावीचे शुल्क ४१५ रुपये आहे.
परीक्षा शुल्क आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींच्या माध्यमातून साधारणपणे १८० कोटींचे उत्पन्न मिळते. मात्र आता अन्य खर्चामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ न होता खर्च वाढल्याने राज्य मंडळ तोटय़ात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, पूर्वी दहावी आणि बारावीचे मिळून साधारणपणे ३५ लाख विद्यार्थी असायचे. आता विद्यार्थी संख्या ३० लाखांपर्यंत कमी झाल्याने उत्पन्नात वाढ झालेली नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाचे दर वाढले, कागदाचे दर वाढले, मनुष्यबळाचा खर्च मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
परिणामी ४० ते ५० कोटींचा तोटा मंडळाला सहन करावा लागत आहे. असे सूत्रांनी सांगितले आहे.