मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सकस पोषण आहारात मसालेभात, पुलाव, अंडा पुलाव, मूगडाळ खिचडी, वरणभात, तांदळाची खीर, नाचणीसत्त्व आदी १५ पदार्थ देण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण विभागाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेच्या धर्तीवर हा सकस आहार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
नवीन पाककृतींची अंमलबजावणी ही 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना दर दोन आठवड्यांत दररोज नवे पदार्थ देणे शक्य होईल. अनेक विद्यार्थी शिजवलेला आहार पूर्णत: खात नसल्याने त्यांना गरजेप्रमाणे तांदळाचे पदार्थ तयार करून दिल्याने यातून तांदूळ, डाळी, कडधान्ये याचीही बचत होणार आहे.
शालेय पोषण आहारात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त असा आहार दिला जातो. या योजनेसाठी केंद्राकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रती विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम व उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ आणि त्यापासून बनविलेले पदार्थ दिले जातात. यात आता स्थानिक अन्नधान्य, तृणधान्य व इतर पदार्थांचा समावेश केला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या आहार तज्ज्ञांच्या समितीने सूचना करून नवीन पाककृती सुचविल्या आहेत.
विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव अथवा फळ दिले जाणार आहे. पदार्थ बनवताना शाळांतील परसबागेतील भाजीपाल्यांचा वापरही केला जाईल.
चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पाककृती सुधारणा समितीने 15 प्रकारच्या पाककृती देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, अंडा पुलाव, मोड आलेल्या मटकींची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा वरण-भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व आणि मोड आलेले कडधान्य. अंडीपुलाव, केळी किंवा स्थानिक फळ याचा समावेश आहे. प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे हे पदार्थ वेगवेगळ्या दिवशी विद्यार्थ्यांना पुरवले जाणार आहेत.
आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणता पदार्थ द्यावा, याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तर राज्यातील महापालिका क्षेत्रात शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून घ्यावा, असे निर्देश राज्यपालांच्या आदेशानुसार अवर सचिव प्रमोद पाटील यांनी काढले आहेत