सागर जगदाळे
भिगवण : अकलूज येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत 51 फ्रेंचायसी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये भिगवण येथील गडकर सुपरफास्ट अबॅकसच्या स्नेहल गडकर व शैलेंद्र विलास गडकर यांनी मार्गदर्शन केलेल्या ३४ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ माजी उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे यांच्या हस्ते तक्रारवाडी येथे संपन्न झाला. सुवर्णपदक, मेडल देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, सुपरफास्ट अबॅकस चे डायरेक्टर मल्लिकार्जुन घुमे, वाळके सर, माजी केंद्रप्रमुख, कुंभार, तसेच तक्रारवाडीचे सरपंच माननीय सतीश वाघ व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यशवंत वाघ,उपाध्यक्ष अर्जुन जराड , डॉक्टर सतीश नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत विलास गडकर गुरुजी (कार्याध्यक्ष कुंभार समाज संघ महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे दहा विद्यार्थी, द्वितीय क्रमांकाचे सहा विद्यार्थी व तृतीय क्रमांकाचे चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अबॅकस डेमोचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी ग्रामस्थ पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक वाघ यांनी केले तर रेश्मा गडकर यांनी आभार मानले.