उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य व महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मारुतराव रामचंद्र उर्फ एम. आर. राऊत सर (वय -९१ ) यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले आहे.
उरुळी कांचन परिसरातील सामाजिक जडघडणीसहीत शिक्षण क्षेत्रात विस्तारासाठी एम.आर. राऊत यांनी विशेष कार्य केले होते. शिक्षक असून त्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी करुन घेऊन विधायक उपक्रम राबविले.अनिष्ट प्रवृत्तींविरूद्ध लढा व शिक्षक व विद्यार्थी दृढ नाते निर्माण करुन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात भरीव वाटा उचलला, कडक शिस्त , इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व व सातत्याने लिखाण हा त्यांचा वैयक्तिमत्वाचे पैलू होते.
महात्मा गांधी विद्यालयात त्यांनी १९७२ ते १९८९ या काळात १७ वर्षे प्राचार्य म्हणून पद सांभाळले होते. या काळात त्यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल १९७६ साली पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक तर १९७७ साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य असताना विद्यार्थी व शिक्षक या माध्यमातून वृक्षरोपणाची मोठी चळवळ त्यांनी उभी केल्यानंतर त्यांची दखल थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेऊन त्यांच्याकडून या चळवळीची माहिती जाणून घेतली होती.
दरम्यान, भूदान चळवळीत त्यांनी एस.एम.जोशी, शंकरराव देव या नेत्यांच्या बरोबरीने सहभाग घेतला होता. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रह व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला होता. त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.