मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात आठवड्याच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी थोड्या फार वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलेच ‘मालामाल’ केले आहे. अवघ्या एका दिवसात या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची तेजी पाहिला मिळाली.
शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये घसरण होऊनही त्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली. त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. शुक्रवारी हा शेअर 546.90 रुपयांच्या वाढीसह उघडला. दिवसभराच्या व्यवहारात तो 639 रुपयांवर पोहोचला. मात्र, नंतर काही प्रमाणात घट झाली. पण शेवटी तो 15 टक्क्यांच्या वाढीसह 615.40 रुपयांवर बंद झाला. एका आठवड्यात हा स्टॉक 27 टक्क्यांनी वाढल्याचे पाहिला मिळाले.
या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 5 वर्षात जवळपास 600 टक्के परतावा दिला आहे. 5 वर्षांपूर्वी त्याची किंमत 89 रुपये होती. आता तो 615.40 रुपये झाला आहे. या स्थितीत त्याचा 5 वर्षांचा परतावा 591 टक्के होता.
त्रिवेणी कंपनीचे टर्बाइन तयार करण्याचे काम
त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड ही कंपनी 100 मेगावॅट इलेक्ट्रिक (MWe) पर्यंत औद्योगिक स्टीम टर्बाइन तयार करते. कंपनीने 20 पेक्षा जास्त उद्योगांमध्ये 6000 पेक्षा जास्त स्टीम टर्बाइन स्थापित केले आहेत. कंपनीचा 80 पेक्षा जास्त देशांमध्ये व्यवसाय विस्तारला आहे. बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कंपनीचे मार्केट कॅप 19,562.15 कोटी रुपये आहे.