मुंबई : टाटा ग्रुपची प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ अर्थात TCS 17,000 कोटींची समभाग पुनर्खरेदी (शेअर बायबॅक) 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 7 डिसेंबरपर्यंत सहभागी होता येणार आहे. कंपनीने आतापर्यंत चार समभाग पुनर्खरेदी योजनेच्या माध्यमातून भागधारकांकडून 66.000 कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत.
टीसीएस पुनर्खरेदीची 3,470 रुपये या मंगळवारच्या बंद भावाच्या तुलनेत भागधारकांना 20 टक्क्यांचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक सहा समभागांमागे कंपनीकडून एका समभागाची पुनर्खरेदी केली जाणार आहे. कंपनीने प्रत्येकी 1 रुपया दर्शनी किंमत असलेल्या 4.09 कोटी समभागांच्या म्हणजेच सुमारे 17,000 कोटी रुपयांपर्यंत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. प्रत्येकी 4,150 रुपये किमतीला प्रस्तावित समभाग पुनर्खरेदी केली जाणार आहे.
सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार, कंपनीचे 12.69 लाख कोटींचे बाजारभांडवल आहे. समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेतून सर्वाधिक लाभ तिची सर्वात मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला होणार आहे. या बायबॅक योजनेत टाटा सन्स सहभागी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत ‘टीसीएस’ ने आणलेली ही पाचवी समभाग पुनर्खरेदी योजना आहे.