रिलायन्स समूह म्हटलं की अंबानी आठवतात. त्यात धीरुभाई अंबानी हे नाव पहिलं येतं. मग नंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ही नावं येतात. लाखो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची सुरुवात करणारे धीरूभाई अंबानी यांनी अनेक कष्टातून व्यवसाय उभा केला. खूप कष्ट, मेहनत करून त्यांनी अंबानी समूह पुढे आणला.
धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई अंबानी यांची सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. घरातील गरिबीमुळे वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी गावातील धार्मिक स्थळाजवळ फळे आणि भजी विकण्यास सुरुवात केली. मात्र, या कामाचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. वर्षभर पर्यटक आले तर या कामात फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आले पण ते शक्य झाले नाही. अशा स्थितीत त्यांनी काही काळानंतर हे काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर 1948 मध्ये मोठा भाऊ रमणिकलाल यांच्या मदतीने ते येमेनमधील एडन शहरात पोहोचले. येथे ते एका कंपनीत 300 रुपये महिन्यावर काम करू लागले. त्यांनी येमेनमधील अरब मर्चंटसाठीही काम केले. धीरूभाई अंबानी येमेनमधील पेट्रोल पंपावर काम करायचे. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि मेहनत पाहून कंपनीने त्यांना मॅनेजर बनवले. पण तिथे जवळपास सहा वर्षे घालवल्यानंतर 1954 मध्ये धीरूभाई भारतात आले. 1955 मध्ये खिशात 500 रुपये घेऊन नशीब आजमावण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. त्यांचा व्यवसाय प्रवास मुंबई शहरापासूनच सुरू होतो.
मुंबईत पोहोचल्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी भारतीय बाजारपेठ जवळून समजून घेतली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, भारतात पॉलिस्टरची मागणी सर्वाधिक आहे. दुसरीकडे, परदेशात भारतीय मसाल्यांची मागणी खूप जास्त आहे. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आणि भाड्याने घर घेतले. त्यानंतर प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी व्यवसायात प्रगती केली.