मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी उद्योग विश्वात आपलं विशेष असे स्थान निर्माण केले आहे. त्यांची रिलायन्स ही कंपनी विविध क्षेत्रात अग्रेसर होत आहे. त्यात आता रिलायन्स कंपनी अमेरिकन मीडिया कंपनी वॉल्ट डिस्नेचा भारतीय व्यवसाय खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
वॉल्ट डिस्नेचा भारतीय व्यवसाय खरेदी करण्यासाठी नॉन-बाइंडिंग टर्म शीट (करार) वर रिलायन्स इंडस्ट्रीजने स्वाक्षरी केली आहे. याद्वारे डिस्नेमधील किमान 51% स्टेक खरेदी करेल. यानंतर भारतातील सर्वात मोठ्या मीडिया आणि मनोरंजन व्यवसायाची कमान रिलायन्सकडे असेल. हा करार 51:49 स्टॉक आणि रोख विलीनीकरणाचा असेल, जो पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रिलायन्स जानेवारीपर्यंत सर्व नियामक मंजूरी आणि व्यावसायिक आवश्यकता पूर्ण करण्याची तयारी करत आहे. या करारानंतर, रिलायन्सला डिस्ने स्टार व्यवसायात नियंत्रित भागीदारी मिळेल, ज्याचे अंदाजे मूल्यांकन 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच 83,163 कोटी रुपये आहे. तसेच करार पूर्ण झाल्यानंतर डिस्नेकडे या व्यवसायात फक्त अल्पसंख्याक भागीदारी असेल. पण रिलायन्सने वॉल्ट डिस्नेचा भारतीय व्यवसाय खरेदी केल्यास याचा कंपनीला मोठा फायदा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.