नवी दिल्ली : आपण बँकेत धनादेश अर्थात चेक डिपॉझिट केल्यानंतर दोन दिवस वाट पाहावी लागत होती. पण आता चेक क्लिअरन्समध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, चेक क्लिअरन्ससाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. तर अगदी काही तासांमध्येच चेक क्लिअर केला जाणार आहे. याबाबतचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.
आरबीआयच्या माहितीनुसार, नवीन प्रणाली लवकरच लागू केली जाणार आहे. या नव्या प्रणालींतर्गत चेक स्कॅन केला जाणार आहे. त्यानंतर काही तासांत तो सादर केला जाईल आणि क्लिअर केला जाईल. याचा परिणाम काही तासांत चेक क्लिअरिंग होईल तर सध्या यास दोन दिवस लागतात तो आता कालावधी कमी होऊन ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय, आरबीआयने प्रत्येक पंधरवड्याला त्यांच्या ग्राहकांबद्दल बँकांनी दिलेल्या क्रेडिट रेकॉर्ड कंपन्यांना अहवाल देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या हा अहवाल महिन्यातून एकदा दिला जातो.
सध्या चेक क्लिअरन्सला लागतात दोन दिवस
सध्या चेक डिपॉझिटपासून चेक क्लिअरन्सपर्यंत दोन दिवस लागतात. मात्र, नव्या प्रणालीमध्ये चेक जमा झाल्यानंतर काही तासांतच क्लिअर केला जाणार आहे. या निर्णयामुळे आता चेक क्लिअरन्सनंतर काही तासाच पैसे जमा होणार आहेत.