RBI Penalty on Banks : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 सहकारी बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. देशातील पाच सहकारी बॅंकांना आरबीआयने दहा लाखांपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. त्यात महाराष्ट्रातील चार सहकारी बॅंकांचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्या बँकांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुस्लिम सहकारी बॅंक लिमिटेड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड, कोल्हापूर अर्बन सहकारी बॅंक लिमिटेड आणि कोयना सहकारी बॅंक लिमिटेड या महाष्ट्रातील बॅंकांना दंड ठोठावला आहे. तसेच ओडिसामधील नाबापल्ली सरकारी बॅंक लिमिटेड बॅंकेलाही दंड ठोठावण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बँकांना ‘या’ कारणामुळे ठोठावला दंड….
मुस्लिम सहकारी बॅंकेने डिपॉझिट खात्यासाठी जारी केलेल्या निर्देशाचे पालन न केल्याबद्द्ल आरबीआयने तीन लाखांचा दंड ठोठावला आहे. ज्या खात्यांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ देवाणघेवाण झाली नाही, अशा खात्यांचा वार्षिक आढावा घेण्यात मुस्लीम सहकारी बॅंक ही अयशस्वी ठरली आहे.
कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बॅंकेने संचालक, त्यांचे हितसंबंध किंवा नातेवाईक या संबंधितांना कर्ज आणि अॅडव्हान्सबाबत जारी केलेल्या निर्देशाचे पालन केले नसल्याचे आरबीआयला आढळले. त्यामुळे कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.
कोयना सहकारी बॅंकेची 31 मार्च 2023 पर्यंतच्या आर्थिक स्थितीबाबत आरबीआयने तपासणी केली असता या बॅंकेत सक्रीय नसलेल्या कर्ज खात्यातून व्यवहार झाले आहे. मालमत्तेचे वर्गीकरण, आवश्यक उत्पन्न ओळख आणि तरतुदी नियमांनुसार काही कर्ज खात्यांचे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट म्हणून वर्गीकरण करण्यात बॅंक अपयशी ठरली आहे. या कारणामुळे आरबीआयने या बॅंकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने बॅंकिंग नियमन कायदा (BR Act) कलम 20 चे उल्लंघन केल्याचे आरसीबीच्या तपासामध्ये समोर आले आहे. त्यामुळे आरबीआयने त्या बॅँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बॅँकेने संचालकांना चुकीच्या पद्घतीने कर्ज मंजूर केले असल्याचे आरबीआयला आढळून आले.