नवी दिल्ली: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्यानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, उत्तराधिकारी पदासाठी नोएल यांची निवड होण्याच्या अगोदर अनुभवाची आवश्यकता महत्त्वाची होती, असे रतन टाटा यांनी आपल्या ‘रतन टाटा ए लाइफ’ या पुस्तकात म्हटले.
टाटा ट्रस्ट अप्रत्यक्षपणे १६५ अब्ज टाटा समूहाचे संचालन करतो. मार्च २०११ मध्ये, रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उत्तराधिकाऱ्यांत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे रतन टाटा यांनी उत्तराधिकारी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. रतन टाटा यांनी ‘रतन टाटा ए लाइफ’ या पुस्कात या निर्णयाचा पश्चाताप झाल्याचे म्हटले आहे.
पुस्तकात असे म्हटले आहे की, रतन टाटा निवड समितीपासून दूर राहिले. कारण टाटा समूहातील अनेक उमेदवार स्पर्धेत होते आणि त्यांना आश्वासन द्यायचे होते की, एक सामूहिक संस्था एकमताने घेतलेल्या निर्णयावर आधारित त्यांच्यापैकी एकाची शिफारस करेल. निवड समितीपासून दूर राहण्याचे दुसरे कारण वैयक्तिक होते. कारण असे मानले जात होते की, त्यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा हे त्यांच्यानंतरचे नैसर्गिक उमेदवार आहेत.
पुस्तकानुसार, रतन टाटा यांच्यासाठी केवळ व्यक्तीची प्रतिभा आणि मूल्ये महत्त्वाची आहेत. पुस्तकानुसार सर्वोच्च कामासाठी यशस्वीपणे स्पर्धा करण्यासाठी, नोएलला त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक आहे. रतन टाटा म्हणाले होते की, त्यांना मुलगा असता तरीही त्यांनी असेच केले असते.