मुंबई : सध्या ऑनलाईन व्यवहार करताना पेटीएमचा वापर वाढला आहे. पैसे पाठवताना किंवा प्राप्त करताना हे माध्यम वापरले जाते. त्यात आता छोटी पोस्टपेड कर्ज कमी करण्याच्या योजनेमुळे पेटीएमच्या शेअर्सला मोठा धक्का बसला आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये 20 टक्के घसरण झाली.
पेटीएम वॉलेट कंपनीने लहान आकाराची पोस्टपेड कर्ज कमी करण्याची आणि मोठ्या आकाराची वैयक्तिक कर्ज आणि व्यापारी कर्जे वाढवण्याची योजना जाहीर केली. ब्रोकरेजला कंपनीचा हा निर्णय आवडला नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीचे रेटिंग कमी केले आहे. त्यानुसार, पेटीएमचे शेअर्स बीएसईवर 744.95 रुपये आणि एनएसईवर 728.85 रुपयांच्या घसरणीसह उघडले. उघडल्यावर त्यात 20 टक्क्यांची घसरण झाली आणि बीएसई आणि एनएसई दोन्ही निर्देशांकांवर पेटीएमचे शेअर्स अनुक्रमे 650.65 रुपये आणि 650.45 रुपयांवर पोहोचले.
आरबीआयने लहान कर्जाचे जोखीम वेटेज 25 टक्क्यांनी वाढवले आहे आणि ते 100 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम कडक केले आहेत. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर वैयक्तिक कर्ज महाग होणार असून, पेटीएमसारख्या कंपन्यांना असुरक्षित वैयक्तिक कर्जाची संख्या कमी करणे भाग पडले आहे.
दरम्यान, लहान पोस्टपेड कर्जाचा आकार कमी करण्याच्या निर्णयामुळे नजीकच्या काळात पेटीएमच्या कर्ज वितरणामध्ये घसरण होईल, असा देखील अंदाज लावला जात आहे.