नवी दिल्ली : ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात सेबीने (SEBI) आपल्या नियमांत बदल केला आहे. सेबीने पेपर फॉर्ममध्ये सिक्युरिटीज ठेवणाऱ्यांसाठी नियम आता सोपे केले आहेत. या अंतर्गत पॅन, केवायसी (नो युअर कस्टमर) तपशील आणि नॉमिनेशन नसलेल्या सिक्युरिटीजवर बंदी घालण्याची तरतूद काढून टाकण्यात आली.
‘रजिस्ट्रार असोसिएशन ऑफ इंडिया’कडून मिळालेला अहवाल आणि गुंतवणूकदारांच्या सूचनांच्या आधारे बेनामी देवाणघेवाण अधिनियम 10988 आणि मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत शेअरवर बंदी घालणे आणि त्याच्याशी निगडित प्रशासनिक आव्हानांना कमी करण्यासाठी तरतूद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सेबीने म्हटले आहे. लिस्टेड कंपन्यांमधील फिजिकल सिक्युरिटीजच्या सर्व धारकांना पॅन, नामांकन, संपर्क तपशील, बँक खात्यांचे तपशील आणि संबंधित ‘फोलिओ’ क्रमांकासाठी स्वाक्षरी देणे अनिवार्य होते.
सेबीने यासंदर्भातील एक परिपत्रक जारी केले आहे. याचा उद्देश नियम सुलभ करणे हा आहे. हा नियम तत्काळ लागू करण्यात येणार आहे. ‘रजिस्ट्रार असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि गुंतवणूकदारांकडून सूचना मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.