मुंबई : देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी शुक्रवारी सलग सातव्या सत्रात नवीन विक्रमी उच्चांक गाठला. सकाळी बीएसई सेन्सेक्स 34 अंकांनी वाढून 85,870 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 अंकांनी वाढून 26,227 वर व्यवहार करताना दिसून आला. या काळात सेन्सेक्स 86,000 चा टप्पा गाठण्यापासून केवळ 130 अंक दूर राहिला.
गेल्या बुधवारी यूएस मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्हने व्याजदरात लक्षणीय कपात केल्यानंतर निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स अनुक्रमे 3.3% आणि 3.5% वाढले. यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत परकीय गुंतवणूक वाढण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गेल्या सहा दिवसांत 15,098 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत, जे व्याजदर कपातीपूर्वीच्या सहा सत्रांच्या तुलनेत 13,452 कोटी रुपये अधिक आहेत.
सेन्सेक्स समभागांमध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस आणि सन फार्मा वाढीसह उघडले. तर पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, एल अँड टी, एम अँड एम आणि एचडीएफसी बँक नुकसानासह उघडल्याचे पाहिला मिळाले.