मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपन्या सातत्याने नवनवीन व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे या समूहाची व्याप्ती मोठी होत आहे. आता मुकेश अंबानी यांची कंपनी ‘रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड’ने यूकेच्या ‘सुपरड्राय’सोबतच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे.
रिलायन्स रिटेलच्या यूकेच्या ‘सुपरड्राय’सोबतच्या भागीदारीत रिलायन्स रिटेलकडे 76 टक्के आणि सुपरड्रायकडे 24 टक्के हिस्सा असेल. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक असून, देशात रिलायन्स रिटेलचा दबदबा सतत वाढत आहे. हा संयुक्त उपक्रम सुपरड्रायसोबत रिलायन्स यूकेमार्फत केला गेला.
‘आरबीयूके’ ही रिलायन्स लिमिटेड अंतर्गत पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या करारासाठी आरबीके एकूण 40 दशलक्ष ब्रिटिश पौंड खर्च करणार आहे. यूके आधारित सुपरड्रायची 51 देशांमध्ये 213 स्टोअर्स आणि 410 सुपरड्राय ब्रँडेड फ्रेंचायझी आणि परवानाकृत स्टोअर्स आहेत.
रिलायन्ससोबत आयपी जाहीर करताना आनंद..
‘आमच्या दीर्घकालीन भागीदार रिलायन्ससोबत हा आयपी करार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमची नवीन भागीदारी रिलायन्ससोबतच्या आमच्या उत्कृष्ट विद्यमान संबंधांवर आधारित आहे’, असे सुपरड्रायचे संस्थापक व सीईओ ज्युलियन डंकर्टर्न यांनी सांगितले.