नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने परकीय चलन साठ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. परकीय चलन साठा चार महिन्यांत पहिल्यांदाच 600 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. यापूर्वी याच वर्षी 11 ऑगस्टमध्ये परकीय चलनाचा साठा 600 अब्ज डॉलरच्या वर गेला होता. 1 डिसेंबरपर्यंत भारताकडे 604 अब्ज डॉलर्स परकीय चलनाचा साठा असल्याची माहिती दिली जात आहे.
परकीय चलनाचा साठा यापूर्वी 24 नोव्हेंबरला 597.93 अब्ज डॉलरवर गेला होता. तर, जो ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने 642 अब्ज डॉलर्सचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. यूएसमध्ये रोखे उत्पन्न वाढल्याने 2023 मध्ये भारतीय रुपयाची अस्थिरता इतर उद्योन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांच्या तुलनेत कमी आहे, असे द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले होते.
यानंतर, मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षीपासून जगभरातील घडामोडींमुळे रुपयाला दबावापासून वाचवण्यासाठी या राखीव निधीचा वापर केला होता. ज्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली. 1 डिसेंबर 2023 रोजी भारताचा परकीय चलन साठा 604 अब्ज डॉलर होता. याद्वारे आपण आपल्या बाह्य वित्तपुरवठा गरजा सहज पूर्ण करू शकतो.