नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने लॅपटॉपच्या आयातीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि आयटी हार्डवेअर साहित्याची आयात करण्यासाठी कंपन्यांना सरकारची परवानगी आवश्यक होती.
आता याबाबतच्या 110 अर्जांना सरकारने मंजुरी दिली आहे. देशात आयात होणाऱ्या आयटी हार्डवेअर साहित्याची मॉनिटरिंग करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. या प्रॉडक्ट्सची आयात करण्यासाठी आता इंपोर्टरला संख्या आणि किंमत याचा खुलासा करणे गरजेचे आहे. याबाबत सरकारला आतापर्यंत 111 अर्ज मिळाले होते. त्यातील 110 अर्जांना सरकारने मंजुरी दिली आहे. आता कोणताही अर्ज प्रलंबित नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारने भारतात या वस्तूंचे उत्पादन वाढावे यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र, हार्डवेअर कंपन्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यानंतर देशातील पुरवठ्याला अडथळा येऊ नये यासाठी बॅकफुटवर जात सरकारने अर्ज प्रक्रियेची घोषणा केली.
लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि आयटी हार्डवेअर आयातीची परवानगी मिळालेल्या कंपन्यांमध्ये डेल इंडिया, ॲपल इंडिया, एचपी इंडिया, लिनोव्हो इंडिया, आसुस इंडिया, आयबीएम इंडिया, सॅमसंग इंडिया, श्याओमी इंडिया, सिस्को कॉमर्स इंडिया, सीमेन्स लिमिटेड आणि बॉश लिमिटेड अशा कंपन्यांचा समावेश आहे.