नवी दिल्ली: अलीकडच्या आठवडयात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे वाहनांच्या इंधनावरील पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाली आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर २ ते ३ रुपयांनी कमी करण्यास वाव मिळाला आहे, असे रेटिंग एजन्सी इक्राने गुरुवारी म्हटले आहे.
भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत सप्टेंबरमध्ये सरासरी ७४ डॉलर प्रति बॅरल आहे, जी मार्चमध्ये ८३-८४ प्रति बॅरल होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील वर्षी २ रुपयांनी कपात करण्यात आली होती. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपन्यांसाठी (ओएमसी) मोटार वाहन इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील विपणन मार्जिन अलिकडच्या आठवडयात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सुधारले आहे, असे इक्राने एका पत्रकामध्ये म्हटले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरकोळ इंधनाच्या किमती कमी होण्यास वाव आहे, असा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे.
इक्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि गटप्रमुख गिरीश कुमार कदम म्हणाले, इक्राचा अंदाज आहे की, सप्टेंबर २०२४ मध्ये (साटेंबर १७ पर्यंत) आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किमतींच्या तुलनेत ओएमसीची निव्वळ प्राप्ती पेट्रोलसाठी प्रति लिटर १५ रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर १२ रुपये अधिक होते. या इंधनाच्या किरकोळ विक्री किमती (आरएसपी) मार्च २०२४ पासून समान राहतील. असे दिसते की, कच्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास, प्रति लिटर २ ते ३ रुपयांनी कमी होण्यास वाव आहे.