नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. या बैठकीपूर्वीच अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. सिगारेट-तंबाखूपासून ते कोल्ड्रिंकपर्यंत अनेक वस्तू महागणार असल्याचेही म्हटले जात आहे.
केंद्र सरकारकडून जीएसटीच्या रेटमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी, स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) तंबाखू उत्पादनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. मात्र, या महिन्यात 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
सध्या 35 टक्के जीएसटी रेट हा 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्क्यांच्या विद्यमान चार स्लॅब व्यतिरिक्त असणार आहे. त्यातच रेडीमेड आणि महागड्या कपड्यांवरील कर दर तर्कसंगत करण्याची शिफारस केली आहे आणि 148 वस्तूंच्या दरांमध्ये बदल करण्याची शिफारस देखील केली आहे.
तंबाखूजन्य पदार्थ होणार महाग
मंत्र्यांच्या गटाने सोमवारी सिगारेट आणि तंबाखू तसेच कोल्ड्रिक्ससारख्या उत्पादनांवरील जीएसटी दर सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास या उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे.