शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच विविध कंपन्यांकडूनही आपल्या भागधारकांना लाभांश दिला जात आहे. त्यात आता फेसबुकची मूळ कंपनी मेटाने पहिल्यांदाच आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सीईओ मार्क झुकरबर्गला या लाभांशाचा मोठा फायदा होणार आहे.
2022 या वर्षात शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर 2023 हे मागील वर्ष हे रिकव्हरीचे ठरले. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी आणि आपले प्राधान्यक्रम पुन्हा समायोजित करण्यासाठी गेल्या वर्षी 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर 2023 मध्ये मेटा शेअर्सची किंमत जवळपास 3 पटीने वाढली होती. त्यात आता लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. साधारणपणे टेक कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देत नाहीत. कमावलेला पैसा लाभांशावर खर्च करण्याऐवजी ते नवीन उत्पादनांवर किंवा नवीन अधिग्रहणांवर खर्च करतात.
पण आता फेसबुकने आपल्या भागधारक अर्थात शेअर होल्डर्ससाठी लाभांश देण्याचे जाहीर केले. मेटाच्या या घोषणेमुळे झुकरबर्ग दरवर्षी सुमारे 700 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 5800 कोटी रुपये कमावतील, असा अंदाज आहे. मेटाचे हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.