नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच स्वस्त गुंतवणुकीच्या आणि चांगल्या परताव्याच्या शोधात परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातील महागडे शेअर्स टाळत आहेत. त्याऐवजी ते प्राथमिक बाजारातील प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPOs) मध्ये पैसे टाकत आहेत, ज्यांचे मूल्यांकन कमी आहे.
डिपॉझिटरी डेटानुसार, प्राथमिक बाजारात 12,336.8 कोटींची निव्वळ गुंतवणूक IPO द्वारे केली गेली आहे. एका हवालानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी यावर्षी प्राथमिक बाजारात 50,354.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत, जे 2021 नंतरचे सर्वाधिक आहे. आशियाई बाजारांमध्ये भारतात सर्वाधिक IPO सूचीबद्ध आहेत. या डेटानुसार, भारताची प्राथमिक बाजारपेठ वाढताना दिसत आहे. यावर्षी आतापर्यंत 61,264.7 कोटी किमतीचे IPO सूचिबद्ध झाले आहेत, जे आशियातील सर्वाधिक आहे.
चीन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे कोट्यवधींचे IPO सूचीबद्ध झाले आहेत. किरकोळ, निर्देशांक, ईटीएफ आणि बहुतेक संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्याकडून फारशी स्पर्धा नसल्यामुळे प्राथमिक बाजारातील मूल्ये कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदार आयपीओमध्ये पैसे गुंतवत असल्याचे समोर आले आहे.