मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आता वाढताना दिसत आहे. ज्यादा परताव्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. त्यात अलीकडच्या काही महिन्यांतील बाजार तेजीने लक्षणीय प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. परिणामी, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस देशातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने प्रथमच 13 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
भांडवली बाजारात व्यवहार करण्यासाठी उघडण्यात येणारे ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नामनिर्देशनाची (नॉमिनी) नोंद करण्यासाठी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ ने 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यांसाठी नामनिर्देशनाची नोंदणी करणे गुंतवणूकदारांना आवश्यक आहे. हा पर्याय न स्वीकारल्यास ट्रेडिंग आणि डिमॅट खाते गोठवू इशाराही ‘सेबी’ने दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात 31 लाख नवीन खाती
मागील महिन्यात सप्टेंबरमध्ये 31 लाख नवीन डिमॅट खात्यांची भर पडली आहे. तर चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत मासिक आधारावर सरासरी 21 लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली आहेत. सीडीएसएल ही आठ कोटींहून अधिक सक्रिय डिमॅट खात्यांसह देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असून, तिने 74 टक्के बाजारहिस्सा व्यापला आहे. तर उर्वरित 26 टक्के डिमॅट खाती एनएसडीएलकडे आहेत.